Thursday, June 28, 2012

मुख्यमंत्री कार्यालयातील १५ हजार कागदपत्रे सुरक्षित...

दैनिक लोकमत, मुंबई दिनांक २८.०६.२०१२ रोजी प्रकाशित लेख


आमदार, खासदारांची पत्रे; दिल्लीचा पत्रव्यवहार वाचला

मंत्रालयातील भीषण आगीतही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातील तब्बल १५ हजार कागदपत्रे सुरक्षित राहिली. त्यात आमदार-खासदारांचा पत्रव्यवहार, दिल्लीशी मुख्यमंत्र्यांनी केलेला पत्रव्यवहार आदींचा समावेश असल्याने संबंधित विभागांमधील जळालेल्या फायलींची पुर्नबांधणी करण्यास मोठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकक्षात डॉक्युमेंट जर्नी मॅनेजमेंट सिस्टीम (डीजीएमएस) या संगणकीय ट्रॅकिंग प्रणालीद्वारे बहुतेक डाटा सुरक्षित आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव शेखर गायकवाड यांच्या लॅपटॉपमध्ये हजारो पत्रे व माहिती सुरक्षित असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार-खासदार आणि इतर व्हीआयपींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेली - दिलेली पत्रे, निवेदने, त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने केलेली कार्यवाहीच्या कागदपत्रांना धक्काही लागलेला नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे आगीत जळाली, असे आमदारांनी समजण्याचे काहीही कारण नाही. 

इंदू मिल, कांदाप्रश्न, कापूसप्रश्न अशा विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि इतर केंद्रिय मंत्र्यांना लिहिलेली पत्रे जशीच्या तशी आहेत. त्यामुळे त्यावर आधारित काही फॉलोअप केंद्राकडे लगेच करणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यक्रम, त्यांनी आजवर केलेली भाषणे, त्यांच्याकडे असलेली असलेली जिल्हावार माहिती, मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकांचे इतिवृत्त आणि कृती अहवाल (एटीआर) यावर कुठलीही आच आलेली नाही.

नगरविकासच्या १५० फायलींची एकाच दिवसात पुनर्बांधणी

नगरविकास खात्याच्या १५० फायलींची पुनर्बांधणी आज एकाच दिवसात खात्याच्या अधिका-यांनी केली आणि त्या आपल्यासमोर आल्या आहेत, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.

इतक्या भीषण आगीतही कर्मचारी-अधिका-यांच्या दक्षतेमुळे माझ्या कार्यालयातील १५ हजार कागदपत्रे सुरक्षित राहू शकली याचे समाधान आहे. माझ्या कार्यालयाचे आणि संबंधित कार्यालयांचे कामकाज सुरळीत होण्यास त्यामुळे मोठी मदत होईल... पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)