सांगली : जिल्ह्यात महसूल विभागाचा चेहरा अद्ययावत करण्यावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी भर दिला आहे. सांगली जिल्ह्याचे ब्रँडिंग करण्यासाठी, त्यांच्या नेतृत्त्वाखाली रिफॉर्म्स इन कलेक्टर ऑफिस या संकल्पनेअंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याची प्रचिती सांगलीच्या जिल्हाधिकारी दालन परिसरात गेल्यावर येते. दालनाच्या दारातच ठेवलेला डिजीटल डिस्प्ले लक्ष वेधून घेतो.
केवळ डिजीटल डिस्प्लेच नव्हे, डिजीटल शेतकरी असो किंवा ई ऑफिसचा कार्यक्षम वापर असो की सात-बारा वाचनालय... अशा तब्बल 101 प्रशासकीय सुधारणा करण्याचा जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांचा मानस आहे. त्याची यादी तयार करण्याचे काम सुरू असून 25 पेक्षा अधिक कामे अंतिम करण्यात आली असून त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे. काही उपक्रमांची अंमलबजावणीही पूर्णही झाली आहे.
श्री. गायकवाड यांचे बळीराजा प्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी एक विशेष ॲप तयार करण्याचे काम सुरू आहे. आष्टा इंजिनिअरींग कॉलेजचे विद्यार्थी हा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्त्वावर करत आहेत. या ॲपमध्ये शेतकऱ्यांची पर्सनल फाईल तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे आधार कार्ड, विविध परवाने, सात-बारा, गॅस क्रमांक, शिधापत्रिका, बँक पासबुक अशा विविध कागदपत्रांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारी कार्यालयात मागितलेली कागदपत्रे बळीराजाला सहजपणे सादर करता येणार आहेत. या ॲपमध्ये शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे कायम स्टोअर राहतील. ती पब्लिक डोमेनला न राहता शेतकऱ्याच्या पर्सनल डोमेनला राहतील. त्यामुळे त्याचा कोणालाही गैरवापर करता येणार नाही. आणि एखाद्या कार्यालयात गेले की कागदपत्रे अपूर्ण म्हणून खेटेही मारायला लागणार नाहीत.
जिल्ह्याची व तालुक्याची महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांना डिजीटल स्वरुपात उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी दालन, प्रांत व तहसील कार्यालयात डिजीटल डिस्प्ले लावण्यात आला आहे. यात शासकीय माहितीबरोबरच जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे, जिल्ह्यातील मान्यवर आदी माहिती दिली जाते. दररोज हा मजकूर बदलला जातो. सामान्य माणसाच्या जगण्याचा संबंध संस्कृतीशी आहे, असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित विविध प्रश्नांवर व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची सूचना दिली आहे, असे स्पष्ट केले आहे. वाळवा, जत, मिरज, कडेगाव प्रांत कार्यालयात आणि तासगाव, विटा तहसील कार्यालयातही हा उपक्रम सुरू आहे.
ई ऑफिसच्या वापराबाबत जिल्हाधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, ई ऑफिसचा कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी डाटा कार्ड व वाय-फाय सुविधा देण्यात येत असून त्यामुळे प्रवासातही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार शेकडो दाखले डिजीटली साईन करू शकणार आहेत. तर इस्लामपूर शहर वाय-फाय करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
माहितीचे संकलन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरुन करण्यासाठी व पाहता येण्यासाठी तसेच वेळेची बचत करण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर सुरु आहे. शेतकऱ्यांशी संबंधित माहिती, न्यायालयीन खटले, शासकीय बैठकांचे इतिवृत्त, सेवाज्येष्ठता यादी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची छायाचित्रे यात देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागत व कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा व महसूल व शेतीविषयक माहिती पोहचविण्यासाठी सात बारा वाचनालय सुरु करण्यात आले आहे, असेही श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाची माहिती एकाच वेळी अनेक व्यक्तींना सुलभपणे पोहचवण्यासाठी क्विक एसएमएस चा वापर सुरु आहे. याशिवाय आय टी सेल, सर्वांचे ई मेल आय डी, व्ही सी, ई-ऑफिसचा कार्यक्षम वापर आदी उपक्रम प्रगतीपथावर आहेत. माहितीचे संकलन अचूकपणे करण्यासाठी व तत्काळ माहिती उपलब्ध होण्यासाठी ई मेलमध्ये फोल्डर तयार केले आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळही नाविन्यपूर्ण करण्यात आले असून, त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांची यादी, भूतपूर्व जिल्हाधिकारी व त्यांची छायाचित्रे अपलोड करण्यात आले आहेत.
मोटार वाहन प्रशिक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. गायकवाड म्हणाले, राज्यात पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात मोठे मैदान असलेल्या ऑटोमोबाईल इंजिनिअरींग महाविद्यालयात मोटार चालविण्याचे प्रशिक्षण देवून परवाना देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागत व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी आर ओ युनिटची प्रक्रियाही सुरू आहे.
पर्यटकांना जिल्ह्यात वळवण्यासाठी माई घाट येथे बोटिंग सुरू करण्यात आले आहे. शिवाय, चांदोली आणि सागरेश्वर अभयारण्यात पर्यटकांना प्रदूषणमुक्त पर्यटनाचा लाभ मिळावा व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी इको-फ्रेंडली व्हेइकल सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासह प्रशासकीय सुधारणांना आधुनिक चेहरा देण्याचा जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांचा प्रयत्न सुरू आहे.