ग दि मा यांच्या आटपाडी तालुक्यातील माडगुळे गावी गेलो आणि त्यांच्या घरा
समोर असे बोर्ड लावले. सांगली ब्रॅन्डिंग चा हा एक भाग आहे.सांगली
जिल्ह्यातील मोठ्या व कर्तुत्ववान लोंकांच्या घरासमोर असे 300 बोर्ड किंवा
रोड साइनेज आम्ही लावणार आहोत.
या वास्तूचं भाग्य तर
फारच थोर! वास्तू कसली, खरं तर गोठाच! १९४८ च्या जळीतात जळलेल्या वाडय़ाची
पुन्हा उभारणी करताना उरल्यासुरल्या सामानातून बांधलेला. आता कौलं, फरशी
वगैरे असली तरी एक लहानशी लांबट १५ बाय २५ फुटांची झोपडी आणि तिच्यावर
पत्रा टाकलेला. खंडोबाच्या देवळाला सामोरी. इथे ‘गदिमां’ना अप्रतिम कविता
सुचली. त्यांना वाटलं, हा वास्तूचा गुण आणि वास्तूला वाटलं, हा अण्णांचा
परीसस्पर्श की ज्यामुळे माझं नाव झालं. घरापासून जवळच ‘पाव’ नावाचे नऊ
एकराचे शेत. खंडोबाच्या माळाकडे तोंड केलं की उन्हाच्या रखरखाटात पाण्याचा
अक्षरश: धावता प्रवाह दिसायचा. या मृगजळाला भुललेले हरणांचे कळप
लांडग्यांच्या मुखात अलगद जायचे. अशा या रखरखीत ओसाड माळरानाचं ‘गदिमां’नी
हिरवाईत रूपांतर करून निवांत केलं. शेजारी आणखी एक १० एकरांचं शेत घेतलं.
दोन्हींकडे विहिरी बांधल्या. बामणाचा पत्रा फुलांप्रमाणेच वेगवेगळ्या
माणसांनीही मोहरला. जेवणाचा खास गावरान बेत! मळ्यातल्या वांग्याचं भरीत,
मीर्चीचा ठेचा, सायीचं दही, कधी पुरणपोळ्यांचा बेत, तर कधी हुर्डा पार्टी. कधी खोडकर मुलाप्रमाणे विहिरीत मुटका मारणं, तर कधी कुस्ती खेळणं. विद्या
वहिनींना पोहायला शिकवायच्या निमित्ताने विहिरीत ढकलून देऊन गटांगळ्या
खायला लावायच्या (त्यांची पुरेशी काळजी घेतलेली असे) आणि घाबरवायचं आणि
त्यांना पोहायला यायला लागल्यावर ‘भोपळ्याला तरंगायला काय खटपट करावी लागते
होय?’ असं म्हणून चेष्टा करायची. समोरच्या दगडावर बसून स्नान करायचं,
दुपारी जेवल्यावर झाडाखाली जमिनीवरच आडवं व्हायचं. कधी आत व्यवस्थित बैठक
घालून उतरत्या डेस्कवर लिहीत बसायचं. गावातल्या व्हरल, रामोशी, धनगर यांना
त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा! ‘आन्ना लिवत्यात’ असं म्हणून कोणी त्यांची
लेखनसमाधी मोडू नये याची ते काळजी घेत. ‘आपला अन्ना’ काहीतरी थोर करतोय, ही
त्यांना पक्की जाणीव. प्रत्येकाला वाटे, आपलं हुन्नर ‘अन्ना’ला दाखवावं.
काही लोक मस्त कथा-अनुभव सांगत, कोणी क्लॅरोनेटवर गाणं वाजवी, कोणी
पारंपरिक वा स्वरचित लावण्या गात, डवरी, मंजिरी वाजविणारा, नाचणारा
वासुदेव, गोंधळी आपली कला दाखवीत. असा हा जनलोक आपणहून येई. ‘अन्ना ऐकतूया’
याचंच त्याला मोठं अप्रुप. अण्णापण ही मोठी समृद्धी जाणत होते. त्यांनी
उराशी घेतलं की, यांना भरून यायचं. आवडायचं, पण बिचकायचंही, ‘जी, उगाच
विटाल व्हईल.’ मग अण्णा शेजारी बसवून घेऊन म्हणत, ‘आरे, कलावंताला जात
नसतीय. महा ब्राह्मण असतोय त्यो.’ बामणाचा पत्रा ही मनोमन समाधानानं डवरून
जात होता, ही वेगवेगळी श्रीमंत माणसं बघून, त्यांची कला बघून. ‘पेडगावचे
शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ या कथांचे स्फूर्तीस्थान. ती अक्षरं कागदावर
उमटताना बघून ‘बामणाचा पत्रा’ धन्य व्हायचा! ‘गदिमा’ वर्षांतून १५ दिवस
वडिलांच्या श्राद्धतिथीनिमित्त यायचेच तेव्हा ‘बामणाचा पत्रा’ आणि परिसर
बहरून जायचा.
या घराच्या भिंतीपाठीमागे एक उभा चिरा बसवला होता.
घराण्यातल्या पराक्रमी पुरुषाचे स्मारक! त्याला ‘विरगळ’ म्हणतात, पण आज
‘गदिमा’, ‘व्यंकटेश’ यांच्या रूपाने दोन नवे ‘विरगळ’ उभे राहिले आहेत. ते
फक्त त्यांच्या घराण्यातल्या लोकांचेच नव्हे तर समस्त मराठी रसिकजनांचे
श्रद्धास्थान बनले आहेत.