महाराष्ट्र राज्य हे भारत देशाचा मानबिंदू आहे.
इतिहास, कला, कृषी, व्यापार, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो महाराष्ट्र हा कायमच
अग्रेसर राहिला आहे. मात्र भौगोलिक कारणांमुळे या राज्याला पाण्याच्या बाबतीत काही
मर्यादांना तोंड द्यावे लागते. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात एक मोठा दुष्काळ
ठरलेल्या 1972 दुष्काळाने शेती, पाणी, रोजगार आणि स्थलांतराचे मोठे प्रश्न निर्माण
केले. महाराष्ट्राला प्राचीन काळापासून दुष्काळाला तोंड द्यावे लागले आहे. कृषी
क्षेत्रावर अवलंबून लोकसंख्येत वाढ; उत्पादनवाढीच्या गरजेतून सिंचनासाठी पाण्याची
वाढती मागणी, हवामान बदलामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळाचे संकट अधिकच
व्यापक होत गेले. महाराष्ट्र राज्यात ही
आव्हाने ओळखून 1972 साली भूजलाचे व्यवस्थापन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास
यंत्रणा यासारख्या शासकीय संस्थेची स्थापना झाली.
भूजल आणि दुष्काळ यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.
किंबहुना शेती, पशुधन, ग्रामीण व शहरी लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज, भूजल
आणि दुष्काळ या सर्व घटकांचा एकमेकांशी गुंतागुंतीचा संबंध येतो. प्रस्तुत
पुस्तकाचा उद्देश हा संबंध समजून घेणे आणि भूजल व्यवस्थापनातून दुष्काळ
व्यवस्थापनाच्या वाटा सुकर करणे हा आहे. भूजल व्यवस्थापनासारखा गुंतागुंतीचा विषय
सोप्या पद्धतीने समजावा अशीच या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शक्यतो तांत्रिक
बाबी आवश्यक तितक्याच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या
पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत श्री के. पी. बक्षी (माजी सनदी अधिकारी, अध्यक्ष
MWRRA), डॉ. आय. आय.
शाह (निवृत्त अतिरिक्त संचालक, भूसवियं, पुणे), डॉ. मिलिंद देशपांडे (भूसवियं, पुणे),
डॉ. हिमांशू कुलकर्णी, (वरिष्ठ
भूजलतज्ज्ञ, ॲक्वाडॅम, पुणे), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचारी
वृंद यांच्याशी झालेल्या चर्चा, क्षेत्रभेटी, शासकीय अहवाल यातून हे पुस्तक आकाराला येत गेले. या सर्वांचे
मन:पूर्वक आभार!
या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारतातील जलसंपत्तीचा
विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात वेध घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या प्रकरणात
महाराष्ट्रातील भौगोलिक संरचनांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. भूजलाशी
संबंधित मुलभूत संकल्पना व महाराष्ट्रातील भूजलाच्या उपलब्धतेबाबत तिसऱ्या
प्रकरणात विवेचन केलेले आहे. दुष्काळ म्हणजे काय आणि भूजलाचा त्याच्याशी संबंध काय
याचा चवथ्या प्रकरणात विचार केलेला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी भूजल
व्यवस्थापनाला पर्याय नाही. पाचवे प्रकरण लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाशी संबंधित
आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही
भागांचा विचार केलेला आहे. आवश्यकतेनुसार काही उदाहरणेही दिलेली आहेत. तर शेवटचे
प्रकरण हे भविष्यातील आव्हानांचा विचार करणारे असे आहे.
असे
म्हणतात की तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल. चेन्नई शहरातील पाण्याची
आणीबाणी, महाराष्ट्रातील लातूर शहराला रेल्वेने पाणी द्यावे लागणे या घटना
भविष्यातील आव्हानांची नांदी आहेत. वेळेवर सावध होण्याचे शहाणपण आपण सर्वांनी
दाखवणे ही काळाची गरज आहे. प्रश्न समजून घेतला की उत्तराच्या शक्यता निर्माण करता
येतात. चला उत्तरे शोधूयात !
~*~
No comments:
Post a Comment