थोर योद्ध्यांची, संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणाऱ्या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य निर्मितीची पूर्ण झालेली 60 वर्षे आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ सुरुवात 19 मार्चपासून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या 60 वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने 19 मार्च ते 1 मे 2021 दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
‘कसेल त्याची जमीन’ हे तत्व घेऊन आलेला कूळ कायदा, हजारो बेघर व भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन मिळवून देणारा ‘कमाल जमीन धारणा’ कायदा आदी जमीन कायद्यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक स्थित्यंतरात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या व्याख्यानमालेत केले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर श्री. शेखर गायकवाड यांची दिलखुलास कार्यक्रमातून ही व्याख्यानमाला प्रसारित होणार आहे.
No comments:
Post a Comment